महाराष्ट्र
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर २४ पुरस्कारांनी गौरवलेला ” राजयोग मार्ग ” लघुपट दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित .
कलाकार रमेश खाडे आणि गौरी कुलकर्णी यांना त्यांच्या दमदार अभिनयासाठी अनेक पुरस्कार

मुंबई (प्रतिनिधी) : ब्रह्माकुमारी विक्रोळी सेवा केंद्र घाटकोपर सबझोन प्रस्तुत दीपक सवाखंडे दिग्दर्शित ”‘राजयोग मार्ग’” या हिंदी लघुपटाने राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश मिळवत एकूण २४ पुरस्कारांची शृंखला पटकावली आहे. विशेषतः या लघुपटाला प्रतिष्ठित ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ प्राप्त झाला असून, बी.के. निलीमा दिदी आणि दिग्दर्शक दीपक सवाखंडे यांचा याप्रसंगी सन्मान करण्यात आला.
. या लघुपटाचे लेखन व संवाद लेखक गणेश महिंद्रकर यांनी केले असून, पटकथा आणि संकलन ही जबाबदारी स्वतः दिग्दर्शक दीपक सवाखंडे यांनी पार पाडली आहे.
अभिनयाच्या आघाडीवरही चित्रपटाने उत्तम कामगिरी केली आहे. कलाकार गौरी कुलकर्णी आणि रमेश खाडे यांना त्यांच्या दमदार अभिनयासाठी अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. चित्रपटाचे मनोहारी छायाचित्रण संदीप सकट यांनी आपल्या कॅमेऱ्यातून साकारले आहे.
यामध्ये मिनल लाड,धारणा सचदेव,अजय सचदेव, क्षिप्रा नानजकर, बी.के. वैशाली, यांनी देखील अत्यंत महत्त्वाच्या भूमिका साकारत लघुपटास अधिक ताकद दिली. या चित्रपटाच्या यशामध्ये शांताराम जाधव यांचे योगदानही मोलाचे ठरले.
” राजयोग मार्ग’ हा लघुपट अध्यात्मिक शांती, आत्मजागरूकता आणि सकारात्मक जीवनदृष्टी यांचा प्रभावी संदेश देत प्रेक्षकांच्या मनावर खोल परिणाम करतो. या लघुपटाने अनेक महोत्सवांमध्ये आपली छाप सोडली असून, समीक्षक व प्रेक्षक दोघांकडूनही भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.